औरंगाबाद: विधान परिषद निवडणुकीकरिता अत्यंत कमी कालावधी हाती आहे. लवकर अर्ज दाखल करून काही गोष्टींचे नियोजन करून काम केल्यास व ही गणित जुळली तर आपला उमेदवार निवडून येऊ शकतो असा दावा काँग्रेस पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी बुधवारी गांधी भवन येथे आयोजित बैठकीत केला.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. महिन्यापेक्षा कमी कालावधी निवडणुकीकरिता असल्याने त्यादृष्टीने बुधवारी गांधी भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना पटेल यांनी हाती अत्यंत कमी कालावधी शिल्लक असल्याने होईल तेवढ्या लवकर अर्ज दाखल करून गणित जुळवल्यास विजय आपलाच असे पदाधिकाऱ्यांना बोलताना सांगितले.
मतांची आकडेमोड केली तर जिंकणे सोपे असल्याचा दावा आमदार तथा संभाव्य उमेदवार सुभाष झांबड यांनी केला आहे. पटेल यांनीही दोनवेळा हि निवडणुक जिंकलेली आहे, मलाही दोन वेळा हि निवडणुक लढवण्याचा अनुभव आहे. तुमची इच्छाशक्ती व ताकद मला हवी आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार सुभाष झांबड असेल किंवा कुणीही असेल, आपण सर्वांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्याला काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असेही झांबड म्हणाले. शहराध्यक्ष नामदेव पवार, कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रभाकर पालोदकर, प्रकाश मुगदिया, सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, श्रीराम महाजन, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज ठोंबरे, गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेवक अफसर खान, सायली जमादार यांच्यासह महानगरपालिका, नगरपालिका, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आदींची उपस्थिती होती.
मला हिशोब चुकते करायचे...
पक्षातील कुठलीही जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहोत उमेदवार कुठलाही असो पाठीशी उभा राहू यावेळी संधी द्या कारण मला बरेच हिशोब चुकते करायचे आहेत असा इशारा यावेळी झांबड यांनी दिल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये या इशारा याबाबत जोरदार चर्चा ऐकायला मिळाली.
झांबड यांनाच मिळावी उमेदवारी
औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार सुभाष झांबड यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असा सूर सध्या मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे झांबड हेच संभाव्य उमेदवार असल्याचे बोलले जात आहे.